Tuesday, April 23, 2024

पुरुषोत्तम हनुमान

मारुती किंवा हनुमान हे पुरुषोत्तमाचे रूप आहे. 

हा पुरुषोत्तम कसा असतो? तर सुंदर असतो, सशक्त असतो, आणि विधायक असतो. सुंदर, म्हणजे आनंददायीसुद्धा असतो, विकट, म्हणजे समजण्यास कठीणही असतो, आणि भीम, म्हणजे भीतीदायकही असतो. 

या पुरुषोत्तमाला केवल-अहिंसेचा मार्ग धरून चालत नाही. केवळ सत्त्वगुणी नाही, तर त्रिगुणातीत होऊन हिंसेचा तमोगुणी प्रयोगही योग्य वेळी करावा लागतो. 

मारुतीच्या गोष्टींमधलं लंकादहनाचं कथानक या त्याच्या पुरुषोत्तम रूपाचं सर्वस्वी जाणीव करून देणारं आहे. 

लंकादहनामध्ये हिंसा आहे का? आहेच! भरघोस आहे! पण ती निष्कारण, नुसती नासधूस करण्यासाठी केलेली तत्त्वहीन, निष्ठाहीन हिंसा नाही. 

त्यात उन्मत्तपणे वागणार्या दैत्यांना आपल्या शक्तीची जाणीव करून देण्याचा हेतू आहे. असेच वागत राहिलात, धर्महीन वागणूक देत राहिलात, तर काय होईल हे दाखवण्याचा हेतू आहे. 

हिंसेला प्रतिकार करण्यासाठी हिंसा अंगीकारावीच लागते. त्यात वाईट काहीच नाही. परंतु आपण प्रतिकार हिंसेला हिंसेनी नाही, तर अधर्माला धर्मानी करतोय, ही समज अंगी बाणायला हवी. ही समज मनात दृढ असणं, हेच पुरुषोत्तमाचं प्रमुख लक्षण. 

मारुतीचा भक्त म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाच्या मनात ही समज घर करून राहिलीच पाहिजे. ही समज जर आली नसेल, तर आपण फक्त बलाचे भक्त ठरतो, सत्य-शिव-सुंदर असलेल्या पुरुषोत्तमाचे नाही. 

याच विचारातून आज हनुमान जयंतीला सुचलेलं हे मारुतीचं स्तोत्र:

लंकादहन स्तोत्र / पुरुषोत्तम मारुती स्तोत्र

भयाकारी हाहाकारी रौद्रभीषण जाहला 
हादरे लंका पुरी हा प्रळय अद्भुत मांडला
मत्त वैभव तोडले उन्मत्त दैत्यहि मोडले
फुटेना वाचा भयाने स्तिमित रावण जाहला ||

पुच्छ धुमधुमते झळाळे हासतो अरिकंदन
धूम्रवर्णी शोभुनी दिसतो कपीकुलभूषण
विकट हास्ये निर्भयाने पुच्छ ऐसे काढिले
तुच्छ ती लंका तयाने सूर्यबिंबा ग्रासिले ||

कोसळाव्या थोर उल्का कपी तैसा भासतो
प्रळयकारी वातनंदन दशमुखाला झोडतो 
जाळितो भुवने क्षणी अन शीघ्रचि घेतो उडी
थोर उडवुनि हा दणाणा सागरी घेतो बुडी ||

तोडिली ती वाटिका ज्यां पृथ्विजेला कोंडले
भुवन लंकेचे पुराने अग्निच्या तुडवाडिले 
थरथरे लंकापती हा पाहुनी कपि विक्रमी
गर्व पूर्णचि काढितो हा ब्रह्मचारी संयमी ||


महाबली हनुमान की जय!


No comments:

Post a Comment