Monday, October 14, 2024

आधुनिक स्त्रीवाद, अर्थात Feminism, वर थोडेसे


भगवद्गीता अध्याय १, श्लोक ४०-४१

अर्जुन उवाच -
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः,
धर्मे नष्टे कुलम् कृत्स्नम् अधर्माभिभवत्युत ।।
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः,
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः ।।

(कुलक्षय झाला तर कुलधर्म बुडीस जातो. कुलधर्म बुडाला तर तशीच पोकळी राहत नाही. त्याच्या जागी अधर्म फोफावतो. मोठं झाड कोसळून पडलं तर ती जागा तशीच मोकळी राहत नाही. तिथे बुरशी, बांडगुळे, आणि कृमी-कीटक वाढीस लागतात. अधर्म फोफावला की स्त्रियांची वागणूक बिघडते (प्रदूषित होते). बिघडलेल्या स्त्रिया वर्णसंकर, म्हणजे समष्टीच्या विनाशाला कारणीभूत होतात.)

अर्जुनाने आपल्याला ७,५०० वर्षांपूर्वीच ही चेतावणी देऊन ठेवलेली आहे.

आपला कुरुवंशासारखा कुलक्षय झाला नसला, तरी कुलाभिमान बाळगणे म्हणजे काय, हे आपण विसरून गेलो. कुलधर्म म्हणजे काय, त्याचे उद्दिष्ट काय, हेच आपण विसरून गेलो. 

प्रामाण्यबुद्धिः वेदेषु
साधनानाम् अनेकता ।
उपास्यानाम् अनियमः
एतद्धर्मस्य लक्षणम् ॥

यामधील मधल्या दोन ओळी तेवढ्या आपण ठेवल्या. वेदप्रमाण बुद्धीकडे दुर्लक्ष केलं, आणि ही सर्व ज्याची लक्षणे त्या धर्माकडे दुर्लक्ष केलं. प्रमाण आणि उद्दिष्ट बाजूला ठेवलं, तर नुसतं "साधनानाम् अनेकता" आणि "उपास्यानाम् अनियमः" उपयोगी नाहीच, उलट घातक आहे. पैसा, सत्ता उपास्य दैवत नाही, आणि खोटेपणा, अनीती साधन नाही, हे वेदप्रमाण बुद्धी आणि आत्मज्ञानाच्या उद्दिष्टाशिवाय कसं पटणार?

कुळाचार, कुलधर्म हे साधन होते, साध्य नव्हे, हे आपण विसरून बसलो. 

आपण अहंकार घालवायला नव्हे, तर अंगभूत अहंकार कुरवाळायला कुळधर्म वापरायला लागलो. याने कुलधर्म, कुळाचार लोप पावले. अधर्म उभारी घेऊन वर आला.

पुरुषी अभिमान कशावर आधारलेला असावा हे माहिती नसणाऱ्या (किंवा विसरलेल्या) पुरूषांविरुद्ध स्त्रैण अभिमान कशावर आधारलेला असावा हे माहिती नसणाऱ्या स्त्रियांची फळी तयार झाली. रामाने प्रश्नही न विचारता ज्यांची आज्ञा ऐकावी असे दशरथही नाहीसे झाले, आणि कर्तव्यनिष्ठ रामही. मग रावण, शूर्पणखा, आणि त्राटिकेला आवरणार कोण?

पुरुषी अहंकाराच्या अतिरेकाला प्रत्युत्तर म्हणून "स्त्रीवाद" ही चळवळ अस्तित्त्वात आली हे खरे असेलही, पण स्त्रीवाद जर स्त्रियांच्या अहंकारालाच पाठबळ देणार असेल, तर त्याला अर्थ काय? तुम्हाला उघडपणे "अहंकारवादी" म्हणून जगासमोर यायची लाज वाटते, एवढाच त्याचा अर्थ. एका अर्थानी तेही बरंच आहे म्हणा, पण नाव बदललं म्हणून स्वभाव थोडीच बदलतो?

हल्लीचे "स्त्रीवादी" कदाचित ऋषींच्या यज्ञांत विघ्न आणणाऱ्या त्राटिकेला मारलं, म्हणून रामाला misogynistic abuser ठरवतील, आणि लंकेला जाताना हनुमानाला अडवणाऱ्या सिंहिकेला "feminist icon" म्हणून गौरवतील, कोण जाणे?

दुर्योधनाला त्याच्या आंधळ्या बापावरून टोमणे मारणाऱ्या, आणि मग स्वतःचे शब्द अंगाशी आल्यावर केविलवाणेपणाचं, हतबलतेचं सोंग पांघरणाऱ्या द्रौपदीला या पढतमूर्खांनी "feminist icon" केलंच आहे. मग "स्वतंत्र बुद्धीने" विवाहित रामावर लाईन मारणाऱ्या, आणि राम बधत नाही पाहिल्यावर लक्ष्मणावर डाव टाकणाऱ्या शूर्पणखेलाही या पंक्तीत बसवायला काय हरकत आहे? तिला "strong independent freethinking woman who society couldn't lock up" म्हणायला काय हरकत आहे?

आजच्या भाषेत सांगायचं झालं, तर रामायणातही शूर्पणखेचा "ठरकीपणा" पाठीशी घालणारा एक पुरुष होताच की. त्याचं नाव रावण.

एकवचनी राम, आणि "दशमुख", म्हणजेच दहा ठिकाणी दहा वेगळ्या गोष्टी बोलणारा रावण.
स्वप्रेरणेने रामाचं संरक्षण करण्यासाठी वनवास सहन करणारा लक्ष्मण, रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य करणारा भरत, सख्खा भाऊ धर्म सोडून वागतोय पाहिल्यावर त्याला सोडून "शत्रुपक्षात" सामील होणारा बिभीषण, रावणाची चूक त्याच्या ध्यानी आणून देणारा पण भावाची बाजू न सोडणारा कुंभकर्ण.
रामाला खराब बोरं मिळू नयेेत म्हणून प्रत्येक बोर चाखून पाहणारी शबरी, आणि कैकेयीच्या स्वार्थाला फूस देणारी मंथरा. 
रावणाच्या मायावी भुलावणीला न भुलणारी सीता, आणि रामाला मिळवायला मायावी प्रयोग करणारी शूर्पणखा.
नवऱ्याकडून स्वार्थासाठी वर मागून घेणारी कैकेयी, आणि व्यभिचारी नवऱ्याला सतत सरळ मार्गानी चालायचा उपदेश करणारी मंदोदरी.

मनुष्यस्वभावाची किती वर्णने!
मनुष्यस्वभावाचा किती सखोल अभ्यास!
चांगलं वागणं म्हणजे काय, वाईट वागणं म्हणजे काय, यावर किती सूक्ष्म चिंतन!

पण रावणाची लंका सोन्याची, आणि रामाच्या नशिबात वनवास, हे ऐकूनच ज्यांची मने कलुषित होतात, त्यांना हे कुठलं कळायचं.
प्रतिगामी, oppressive, sexist, misogynist म्हणून लेबलं चिकटवली की झालं, आता या फसव्या लेबलांच्या आडून पुरुषोत्तम रामावर वार करायला हे मोकळे.

आपले "धर्मग्रंथ" लिहिणारे द्रष्टे मूर्ख नव्हते. प्रतिगामी नव्हते. स्त्री-द्वेष्टे तर मुळीच नव्हते. ते तसे होते असं आपल्याला का वाटतं, हा आपण आपल्याला विचारायचा प्रश्न आहे.

पाश्चात्त्य देशांत जे ख्रिस्ताचे झाले आहे, तेच आपल्याकडे रामाचे झाले आहे.

अहंकारी मूर्तीपूजकांना फळ टाकून देऊन साल चघळत बसायची गचाळ सवय असते. स्वतः साल चघळून हे लोक थांबत नाहीत, तर इतरांनाही फळ सोडून साल चघळायला लावतात. मग ती मूर्ती ख्रिस्ताची असो, रामाची असो, नाहीतर अजून कशाची. फळ टाकून दिलं तर साल तुमच्या स्वतःच्या तरी पचनी कशी पडणार? 

फळ काय हे माहितीच नसल्यामुळे, फळाचा आनंद घेणारे कुठेच न दिसल्यामुळे, साल चघळत बसणे हा कसला धर्म, हे कसले कुळाचार, ही कसली परंपरा, हे प्रश्न पुढच्या पिढीमध्ये स्वाभाविकपणे येतात. हा आगाऊपणा नव्हे, तर अत्यंत सयुक्तिक विचार आहेत. 

अहंकारी मूर्तीभंजकांच्या हातात यामुळे आयतेच कोलीत पडते. "आपला शत्रू जर चुका करत असेल तर त्याच्या आड येऊ नये" या न्यायाने, फळाशिवायची साल कशी निरूपयोगी, कशी प्रतिगामी, कशी घातक, हे पुरेपूर ठसवायला मुर्तिभंजक टपलेलेच असतात.

सोप्या शब्दात सांगायचं, तर श्रेष्ठांचे अनुकरण करणे हे धर्माचे रसाळ, तरतरीत, सत्त्वगुणी फळ आहे, त्यांचे पूजन करणे नाही.

पूजनाचा दिखावा करणे सोपे असते. अनुकरण करणे अवघड. भक्तीचा दिखावा करणे सोपे असते. भक्ती करणे महाअवघड.

अनुकरणजनक आदर गंड नष्ट करतो आणि भक्ताला भगवंत बनवतो. भेदजनक पूजन भक्ताला भगवंतापासून कायम दूर ठेवते आणि न्यूनगंड निर्माण करते. न्यूनगंड निर्माण करणे हे "पूजन" या संस्थेचे उद्दिष्टच आहे. 

अनुकरण हे खऱ्या अर्थाने उत्तमाचे पूजन.

आपण अनुकरण उत्तमाचे न करता "उत्तानाचे" करत असू, तर तेसुद्धा पूजनच - फक्त श्रेष्ठाऐवजी कनिष्ठाचे. मांगल्याऐवजी अमंगलाचे. सत्य-शिव-सुंदरा ऐवजी असत्य, अशुभ, असुंदराचे. 

सीता व्हावेसे आजच्या स्त्रियांना वाटणार नाही, हे मी समजू शकतो. पण म्हणून शूर्पणखा व्हायचे, ही कुठली बुद्धी? अबला व्हायचे नाही म्हणून मदांध सबला व्हायचे? हे कसले विचित्र डोहाळे? मंदोदरी व्हायचे नाही म्हणून कैकेयी व्हायचे? शबरी व्हायचे नाही म्हणून सिंहिका व्हायचे, त्राटिका व्हायचे? ही कुठली बुद्धी?

आपल्याला राम व्हायचे आहे, की रावण? वाली व्हायचे आहे, की लक्ष्मण? दुर्गा व्हायचे आहे, की शूर्पणखा? जिजाऊ व्हायचे आहे, की सोयराबाई?

हे स्वतःच स्वतःला विचारायचे प्रश्न आहेत. रावण मरत नाही. कारण रावण ही एक मनोवृत्ती आहे. त्राटिका, शूर्पणखा मरत नाहीत. कारण ती एक मनोवृत्ती आहे. मनोवृत्तीला विरोध मनोवृत्तीनेच करावा लागतो, भौतिक साधनांनी नाही. राममय मनोवृत्ती राखणे, हेच रावणाने ग्रासलेल्या, शूर्पणखेच्या मायावी मगरमिठीत सापडलेल्या मनोवृत्तीला उत्तर आहे.

जोपासावा राम | वाढवावा राम |
फुलवेलु राम | आनंदाचा ||
दशमुखे वेढले मन | ज्याने केले उच्चाटन |
त्याते दिसे निर्गुण | मूळरूप ||
पहावी सीता शांती | लक्ष्मण वैराग्यमूर्ती |
पुढे नतमस्तक मारुती | भीमरूपी ||
ऐशी रघुनंदनाची ख्याती | निर्गुणाची सगुण मूर्ती |
निष्ठुर मन पालटी | खेळीमेळी ||
रामरूपे भरले मन | तेचि पूर्ण ब्रह्मज्ञान |
एक तेचि उत्तम साधन | दास म्हणे ||

- तन्मय