Friday, October 23, 2026

कविता - मावळतीची किरणे

डोळ्यांवरती आली सुंदर मावळतीची किरणे

क्षणभर झाले सुसह्य माझे मुशाफिरीचे फिरणे


अवखळ अवघड वाट मनोहर सोने अवजड ल्याली

गालांवरती चढली अन् सोन्याची तांबुस लाली 


वारा होता चेहर्यावरती अलगद कुजबुजणारा

संध्येचे ते रूप साजिरे हलकेच खुलविणारा


कुठली पुण्ये झाली हातुन क्षण हा हाती आला 

कुठल्या जन्मीचा हा आर्जव आज फळासी आला 


नि:शब्दाचे उरले गाणे सूर तयाचा ओला

मुशाफिरीच्या एकांताचे गूज सांगुनी गेला


- तन्मय वि. टिकेकर

Thursday, October 22, 2026

कविता - माणसं

माणसं कशी लख्ख हवी
सड्यासारखी स्वच्छ हवी
फणसासारखी काटेदार
पण आतून गोड गोड हवी!

पाऊस आला की भान विसरून
भिजून जाणारी माणसं हवी
पावसानंतर स्वतःचं अंगण 
झाडून काढणारी माणसं हवी,
माणसं कशी लख्ख हवी!

गोड बोलून भुलवणारे
साखरपेरले शब्द नको
फिल्टर लावलेले पोर्ट्रेट नको
आरशासारखी स्वच्छ हवी,
माणसं कशी लख्ख हवी!

माणसांना काहीतरी हट्ट असावा 
कुठेतरी धारदार कोपरा असावा 
सरळसोट रस्ता नको
वळणावळणाची वाट हवी,
माणसं कशी लख्ख हवी!

गाभाऱ्यात त्यांच्या ज्योत हवी 
मनात नम्र प्रीत हवी 
पाषाणांवर राम लिहून
माणसं जोडणारी हवी,
माणसं कशी लख्ख हवी!

- तन्मय वि. टिकेकर

कविता - दोन निमिषांची परब्रह्मभेट

दोन निमिषांची । परब्रह्मभेट ।
दिसे का रे नीट । मुख तरी ।।
दोन निमिषांत । मागणे गा-हाणे ।
देवासी सांगणे । कसे तरी ।।
दोन निमिषांत । हाललीच रांग ।
कावला श्रीरंग । विटेवरी ।।

- तन्मय वि. टिकेकर

कविता - रात्र

अंधार असा भोगावा
रात्रीस असे बिलगावे
शब्दांच्या निळसर गात्री
चांदणे फुलारून यावे

दवभिजला प्रकाश होता
हलकेच म्हणावी गाणी
पापण्यांस अन् लावावे
ओढ्याचे निर्मळ पाणी

- तन्मय वि. टिकेकर

कविता - कुंपण

दारी उभा गं साजण
त्याचे लख्ख निळे अंग
मंद निळाईत त्याच्या 
उभी क्षितिजांची रांग

वाडा होता चिरेबंदी
कुणी दार उघडले?
कडीतले देवघर
कुणी अंगणी आणले?

पसरली रानोरान
उदा-धुपातली कथा
गंगा सागरी आणते
जशी पितरांची गाथा

वृक्ष सारे थरारले
अन् पिसाटली राई 
भोळ्या गीताने झिंगली
खुळावली मातीमाई

मग बरसला मेघ
त्याने भरले अंगण
मोरपंखी निळाईला
घालू नये गं कुंपण!

- तन्मय वि. टिकेकर