Sunday, May 17, 2026

गीर्वाक्, गायन, अन् गायत्री: 'गे' 'गे' गाण्याचा

'गे' म्हणजे रे काय, या प्रश्नाचे एक (चुकीचे) उत्तर आजच्या तरुणांना चटकन देता येईल, आणि बर्याच म्हातार्यांना काहीच उत्तर देता येणार नाही.

पण हा 'गे' शब्द भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहे असे जर मी म्हटले, तर या दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. पण तेच सांगायला तर हा तुकडा लिहायला घेतला आहे!

आजच्या परिभाषेने मी 'गे' नाही, पण फार कशाला, फक्त दोनशे वर्षे जरी मागे गेलो, तरी इंग्रजी भाषेमध्ये 'gay' हा शब्द अजूनही 'कलासक्त, आनंदी, सुखी, संतोष देणारे, आनंद शोधणारे' अशा अर्थी वापरण्यात येत होता. या शब्दाचा समलैंगिकतेशी संबंध फार, फार नंतर आला. त्या मूळ अर्थाने मी नक्कीच गे आहे. 


पण 'गे' ची गोष्ट त्याहून खूप मोठी आहे. 


'गे' या शब्दाचा वास्तविकत: समलैंगिकतेशी काहीही संबंध नाही.

गीर्वाग्वाणी सरस्वती मधला जो 'गी' आहे, तोच 'गे' या शब्दाचा मूलाधार. गीत, गायन, आणि गाणे मध्ये जी "ग" अक्षराची भाऊबंदकी दिसते, ते 'गे' या शब्दाचे खरे कुटुंब. संस्कृत, Latin आणि ancient greek या सख्ख्या नाहीतरी मावस बहिणींसारख्या भाषा आहेत, हे ध्यानात ठेवले पाहिजे.

शब्दांची, कलेची, विचारांची सुंदर गुंफण बनवून रसिकांचे मन रिझवणारे गीर्देवता वागीश्वरी सरस्वतीदेवीचे पुत्र, हे खरेतर 'गे' या शब्दाचे मानकरी. समलैंगिकतेशी या शब्दाचा संबंध खरोखरेच फार उशिरा आला, पण 'नवे ते सोने' च्या विकृत आधुनिक मानसिकतेने तो परस्परसंबंध इतका उचलून धरला आहे, की त्या शब्दाचा मूळचा सुंदर, सशक्त, संपृक्त अर्थ समजून घेण्यालाच आज कदाचित वेडेपणा म्हटले जाईल. 


A Gay Couple म्हटले, तर दोन समलैंगिक व्यक्तींचे जोडपे असा अर्थ आज निघेल. पण gay शब्दाचे मूलरूप जर ध्यानात घेतले, तर A Gay Couple चा अर्थ एक आनंदी जोडपे, असा निघतो, आणि याच अर्थाने इंग्रजी भाषेमध्ये gay हा शब्द शतकानुशतके वापरण्यात आला आहे. एखादे जोडपे जर एकमेकांशी संवाद साधत असेल, तर त्यांची एकत्र चालायची वाट कमी कष्ट देते, हे सत्य तर आपण सारे जाणतोच. त्यात जर हास्यविनोदाची, शाब्दिक चढाओढींची, आनंदाच्या देवाणघेवाणीची भर टाकली, तर त्या जोडप्याचे संपूर्ण समीकरणच बदलून जाते, खरे की नाही? एकमेकांचे मन रिझविणारे, एकमेकांच्या दु:खाचा भार हलका करणारे, आणि आनंदाची देवाणघेवाण करीत आयुष्याची वाट चालणारे जोडपे, हे खरे Gay Couple.

'आनंदयात्री' हा 'गे' या शब्दाचा वास्तविक अर्थ आहे. समलैंगिकतेच्या असंबद्ध ओझ्यातून या निरपराध शब्दाची सुटका करण्याचा हा लेख एक प्रयत्न आहे.

समलैंगिकतेच्या चळवळीने जाणूनबुजून नसेलही, पण चुकून का होईना, gay हा शब्द सर्व कलोपासकांकडून, रसभोक्त्यांकडून, जीवनाला आनंदयात्रा मानून जगणाऱ्या सर्वांकडून, हिरावून घेतला आहे. कवी, गायक, संगीतकार, कुठल्याही प्रकारचा कलाकार, रसभोक्ते, सुरलोभी, शब्दलोभी, जे गीर्देवता सरस्वतीलाच मनोमन वरतात आणि तिच्या कृपाप्रसादाने आपलेच नाही तर सर्व रसिकांचे मनोरंजन करतात, मन प्रफुल्लित करतात, चित्त शांत करतात, त्यांना काय समलैंगिकतेच्या लायनीत मोडायचं? वाचिक सौंदर्याचा, सौंदर्यशोधक दृष्टीचा समलैंगिकतेशी काय संबंध?

"साजरा उधळून आयू हो करावा संग हा" म्हणून जीवनातील चांगले पाहणारे सत्यशोधक, 'सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर" म्हणणारे कलंदर, एकेक सूर आयुष्यभर घोटवल्यावर मरता मरता "तो सूर बरोबर लावायचा तेवढा राहिला" म्हणणारे कलाकार, हे सरस्वतीचे पुत्र 'गे' या शब्दाचे खरे मानकरी. 

'गे' या शब्दाचा हा विकृत अपभ्रंश भारतीयांनी अजूनच 'पर्सनली' घ्यावा, याला आणखीनही दोन कारणे आहेत. 


वैदिक संस्कृतीबरोबरच जन्माला आलेले, वैदिक भारतीयांचे तसे पाहिले तर 'सहोदर', म्हणजे पुरातन ग्रीक.

पुरातन ग्रीकांची आपल्या भूदेवीसारखीच Gaea - गाएआ नावाची पृथ्वीदेवता होती. आपल्या 'भूदेवीचे' रूपांतर कालांतराने धनाच्या, संपत्तीच्या, सुबत्तेच्या 'लक्ष्मी' मध्ये झाले. तसेच रूपांतर होऊन ग्रीकांची पृथ्वीदेवता गाएआ भारतीयांच्या सुबत्तेला मोठ्या अंशी कारणीभूत ठरलेली, मातेसमान मानली गेलेली 'गाय' तर झाली नसेल? 'गाय' आणि 'गाएआ' दोन्ही 'गे'चेच भाषिक सहोदर.

भारतीय समाजमनातले 'गाय' शी संबंधित शब्द आणि विचार जर पाहिले, तर ग्रीकांच्या 'गाएआ' या भूदेवतेलाच हिंदू संस्कृतीने गाईच्या, गोमातेच्या, गोधनाच्या रूपात पाहिले, असा सरळ साधा निष्कर्ष काढता येऊ शकतो. गाईंच्या म्हणजेच पृथ्वीदेवता गाएआच्या पिल्लावळीला "वसु" शब्दावरून येणार्या "वासरू" शब्दाने भूषवावे, हीदेखिल साखळी यादृष्टीने निरखून बघण्यासारखी वाटते.

'गे' हा शब्द या दृष्टीने पाहिले तर सरळ सरळ 'भूमीपुत्र' असा अनुवादित होतो. त्याचा समलैंगिकतेशी काय संबंध?


भगवद्गीतेतला गी सुद्धा याच 'गे' चा भाषिक बांधव.

हिंदूधर्मात जो गायत्री मंत्र सर्व उपासनेचे सार म्हणून सांगितला आहे, त्यातला 'गायत्री' शब्दसुद्धा 'आनंदयात्री' या gay च्या मूळ अर्थातूनच आलेला. 

गायत्री नामक छंदाचेच नामरूप घेतलेल्या, "धियो यो न: प्रचोदयात्" म्हणणाऱ्या गायत्री मंत्राचे आपण उपासक आहोत. आपले गणपति अथर्वशीर्ष 'निचृत् गायत्री' छंदात लिहिले गेले आहे. गीर्वाग्वाणी शारदा सरस्वतीच्या पंथात भारतीय संस्कृती अगदी पूर्वापारपासून न्हाऊन निघाली आहे. यामुळेच भारताला अगदी प्राचीन, इतिहासपूर्व काळापासून चालत आलेली कथाकथनाची, काव्याची, नाट्याची, नृत्याची, संगीताची परंपरा मिळालेली आहे. शाब्दिक कोट्या, भाषिक विनोद‌ या मातीतच जणू रुजले आहेत. गाननाट्यनृत्यामध्ये भारतीय माणूस साहजिकपणे रमतो, तल्लीन होऊन नकळत दाद देतो, याचे कारण ही गीर्वाग्वाणी सरस्वतीची आठवण, वाचाशास्त्राची, जीवनाची सुंदरता उचलून धरणाऱ्या जीवनाच्या 'गेयतेची' आठवण.


लैंगिकतेच्या पलिकडे न बघू शकणार्या आधुनिक मानसिकतेने केलेला 'गे' शब्दाचा हा विपर्यास प्रेक्षणीयतेच्या रांगा उल्लंघून आता हास्यास्पदतेच्या राज्यात शिरू लागला आहे. Queer पासून सुरू झालेली चळवळ आता normality ची स्वप्ने बघत आहे. 

जीवनाची 'गेयता' समजून घेऊन लीलेने संसारसागर तरून जाणाऱ्या राम-कृष्णाचे आपण वंशज आहोत, भक्त आहोत. याचा समलैंगिकतेशी संबंध जोडणे हा केवळ अत्याचार आहे. 

समलैंगिकतेबद्दल, असावी, नसावी, चूक, बरोबर, चांगली, वाईट, यातील किंवा अन्य कुठलेही मत मी इथे मांडत नाही आहे. 

'आपला शब्द' चोरीला गेल्याचं दु:ख वाटतं, एवढंच.


© तन्मय टिकेकर

पुणे

१७/०५/२०२६

No comments:

Post a Comment