Monday, April 29, 2024

आपल्याला काय हवंय : बुद्धी, कृत्रिम बुद्धी, कि निर्बुद्धपणा?

 

परवा कृत्रिम बुद्धी (artificial intelligence) वरच्या एका परिसंवादात एक जण म्हणाला, की त्याला कृत्रिम बुद्धी बद्दल एक काळजी वाटते, की कृत्रिम बुद्धीवरती अवलंबून राहून आपलं मानवी मन आणि मेंदू विकलांग होऊन जाईल. मानवी मन आणि मेंदूचा वापर झाल्याने त्यांच्यावर गंज चढेल आणि कदाचित त्यांची पुन्हा भरून येणारी झीज होईल. हे ऐकून मला एकदम हसूच आलं

एकदम आठवलं, की आपल्या पूर्वजांनी यासाठीच संध्याकाळच्या परवचा ची सोय केली होती की! सगळ्यांनी मिळून रोजची स्तोत्रं नियमितपणे म्हटल्यानी स्मरणशक्ती मजबूत राहत असे. वाणीदोष नष्ट होण्याचा एकाग्रता वाढायचा फायदा तर वेगळाच. निधर्मीपणा, बुद्धीवाद, आणि विज्ञानवादाच्या अर्धवट पिकलेल्या संकल्पनांच्या जोरावर आपण ही परवचा ची व्यवस्था किती सहज निकालात काढली!

गणितातले पाढे पाठ करणं शालेय वयात कितीही क्लिष्ट वाटलं, तरी १०व्या वर्षी पाठ केलेल्या पाढ्यांचा आत्ता ३२व्या वर्षीसुद्धा उपयोग होतो, तेव्हा त्याची उपयुक्तता कळते. ज्यांनी तेव्हा पाढे पाठ केले नाहीत, त्यांनी "I have a calculator in my phone, why do I need to learn the tables?" म्हटलं की त्यांची कीवच करावीशी वाटते. फळभाज्या शेतात नाही तर सुपरमार्केट मध्येच पिकतात असं वाटण्याइतकंच हे हास्यास्पद

ज्या दासबोधाबद्दल समर्थांनी "नका करू खटपट | पाहा माझा ग्रंथ नीट | तेणे सायुज्याची वाट | गवसेल की ||" म्हटलं, तो वीस दशकांचा, दोनशे समासांचा दासबोध समर्थांनी कागदावर उतरवण्याआधी मनातल्या मनात "compose" करून ठेवला होता, हे लक्षात आलं की पुन्हा एकदा समर्थांच्याप्रती हात आपोआप जोडले जातात

आपल्या वेद-पुराण-उपनिषदांचं ज्यांनी लेखनाचा शोध लागण्याआधी गुरू-शिष्य परंपरेने तोंडी जतन करून ठेवलं होतं, त्या ऋषी-मुनींची तर आपल्याला कल्पनाही करवणार नाही

जाता जाता, विषय निघालाच आहे तर मनात आलेलं हेही बोलतो, की ब्राह्मणत्वाला हिंदू परंपरेत जास्त महत्त्व मिळण्याला, ज्यांनी हिंदू धर्मग्रंथ तोंडी गुरू-शिष्य परंपरेत पिढ्यानपिढ्या जतन करून ठेवले, ते अलौकिक लोक कारण आहेत. तत्कालीन समाजव्यवस्थेला आधारभूत असलेले हे ग्रंथ पाठ करून ठेवण्याएवढी ज्यांची बुद्वी प्रगल्भ होती, त्यांना समाजात जास्त मान मिळावा, यात नवल ते काय? आजकालचे "ब्राह्मण" ब्राह्मणत्वाचा फुकटचा टिळा तर मिरवतात, पण वेद-पुराणं-उपनिषदं पाठ करणं तर सोडा, साधं वाचत ही नाहीत. हे कसले ब्राह्मण? असो. तो मुद्दा वेगळा. खरं म्हणजे ग्रंथ पाठ करायच्या पुढे ब्राह्मणत्वाची सुरुवात होते. आपण तर डोंगराच्या तळाशी जायलाच कंटाळा करतो. वेद-पुराणं-उपनिषदं पाठ करून पुढे आत्मशोधाचा डोंगर चढून जाणं तर दूरच राहिलं


"जुनं ते सोनं" हे जरी पूर्णतः बरोबर नसलं, तरी त्याला पर्याय म्हणून "सोपं ते सोनं" हे जे ब्रीदवाक्य आपल्या काळात अलिखितरित्या रूढ झालेलं आहे, ते कैक पटींनी वाईट


Dystopian literature मधल्या दु:स्थापित जगांमध्ये मनुष्यजात गुलामीत अडकवलेली दाखवलेली असते. पण "सोपं ते सोनं" या विचारधारेने आपल्याला आपणहूनच गुलामीत जायला भाग पाडले आहे. आपणच जर आपणहून गुलामीत पडायला आसुसलेले असू, तर आपल्यावर मालकीहक्क गाजवू पाहणार्यांची तरी काय चूक


(६ एप्रिल २०१४)

No comments:

Post a Comment