Sunday, June 02, 2024

निधर्मवाद: हिंदुत्व, धर्म, आणि अधर्म

Secularism म्हणजे काय यावर थोडासा विचार करण्याची गरज आज आलेली आहे. याला राजकीय कारणं तर आहेतच, ते नाकारण्यात काहीच अर्थ नाही, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची सामाजिक व वैयक्तिक / मानसशास्त्रीय कारणंही आहेत. 

Secularism ची विचारधारा अस्तित्त्वात आली धर्माच्या नावाखाली स्वार्थ साधणार्या मध्यस्थांच्या विरोधात. पण म्हणून निधर्मीवाद धर्माच्याच विरुद्ध आहे असे मानण्याची काहीच गरज नाही. धर्म म्हणजे काय, हेच न कळल्याचे हे लक्षण आहे. निधर्मीवादाच्या नावाखाली राजकारण करणार्यांना मदत होते, ती प्रजेच्या धर्म, अधर्म, आणि निधर्म या बाबतीतल्या अज्ञानाची. हे अज्ञान जमेल तेवढं पुसण्याचा हा एक प्रयत्न.  

भारतात सध्या जो धर्माच्या नावाखाली अधर्माचा आणि निधर्माचा धुमाकुळ चाललाय, ती केवळ पाश्चात्त्य देशांत घडून गेलेल्या स्थित्यंतराची पुनरावृत्ती आहे. याला भारताने विरोध करायचा झाला, तर तो भारतीय पद्धतीनेच करायला हवा. हे पाश्चात्त्य पद्धतींचे काम नोहे. 

Secularism चा पाठ शिवाजी महाराजांनी ४०० वर्षांपूर्वीच आपल्याला घालून दिलेला आहे. ज्या शिवाजीने सूरत लुटताना ख्रिस्ती धर्मप्रचारकांना हातही लावला नाही, त्याच शिवाजीने त्याच धर्माच्या इंग्रजांच्या वखारी मुळापासून साफ केल्या, याचा अर्थ आजच्या "निधर्मी" लोकांना समजणार नाही. ज्या इस्लामचा गर्व बाळगणाऱ्या सुलतानांशी महाराज आयुष्यभर लढले, तोच इस्लाम पाळणाऱ्या "बाबा याकूत" नावाच्या सद्गृहस्थांचा आशीर्वाद घ्यायला महाराज गेले होते, हे आजच्या "निधर्मी" लोकांना अतर्क्य वाटेल. दाभोळ शहर इस्लामी राजवटीतून मुक्त करण्याच्या मोहिमेच्या आधी महाराज बाबा याकूत ना भेटायला गेले होते, आणि या पीराने त्यांना या मोहिमेसाठी आशीर्वादही दिला, हे ऐकून तर आजच्या निधर्म्यांची बोटंच तोंडात जातील. 

औरंगझेबापासून आदिलशाह पर्यंत सर्व मुस्लिम सुलतान जेव्हा आपल्या कारभारात मुस्लिमांना प्राधान्य देत होते, त्या काळात महाराज आपलं आरमार एका मुस्लिम सरदाराच्या हातात सोडत होते, आणि सुरतेतल्या मुस्लिम व्यापार्यांची संपत्ती लुटतानाही त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका राहणार नाही, याची (शक्यतोवर) काळजी घेत होते. 

आजच्या निधर्म्यांना महाराजांना "निधर्मी राजा" म्हणून गौरवायला आवडतं, पण महाराजांच्या या निधर्मीपणाला हिंदूधर्माची शिकवण कारणीभूत होती, हे ही लोकं सोयीस्करपणे विसरतात. 

धर्म-जात न पाहता केवळ अन्यायावर तुटून पडण्याची ही शिकवण हिंदूधर्मातूनच महाराजांना मिळाली. "ब्राह्मण" असलेल्या रावणाला धर्मसंस्थापनेसाठी जमीनदोस्त करणार्या, आणि त्याला ठार केल्यावर "वैर मरणापर्यंत असतं, त्यापुढे नाही" असे म्हणून आदराने रावणाचे अंत्यसंस्कार करण्यार्या श्रीरामाची शिकवण महाराजांना होती, म्हणूनच ते केवळ महापराक्रमी विजेता न होता "जाणता राजा" झाले, "शिवकल्याण राजा" झाले. 

श्रीरामाच्याही आधी, माणसाचा जन्म, पंथ, वा समाजातील स्थान न पाहता त्याच्या कर्मानुसार त्याची पारख करायची हिंदूधर्मात फार मोठी परंपरा आहे. प्रल्हाद दैत्यकुळात जन्माला येऊनही त्याला विष्णूने नृसिंहरूपात वाचवलं हे आपल्याला माहिती असेल, पण त्याला ज्याच्यापासून वाचवलं, तो हिरण्यकश्यपूही ब्रह्मदेवाच्या वरदानामुळेच देवांना वरताण झाला होता, हा तपशील आपण विसरतो. शिवाने वरदान दिलेल्या भस्मासुराला विष्णूने मोहिनीरूपात ठार केलं (करवलं), आणि ब्रह्मदेवानी वरदान दिलेल्या त्रिपुरासुराला शिवाने, तर महिषासुराला दुर्गेने ठार केलं. 

वरदान देणारेही हिंदू देवच, आणि वरदान मिळालेल्यांचा वध करणारेही हिंदू देवच. असं कसं?? 

याचं उत्तर अत्यंत सोपं आहे: हे सर्व असुर जेव्हा वरदान मागायला तपश्चर्या करत होते, तेव्हा देव त्यांना "असुर" म्हणून पाहतच नव्हते मुळी. तेव्हा ते होते फक्त भक्त. याचक. त्यांचं कर्म जेव्हा अन्यायाकडे झुकायला लागलं, त्यांच्या वरांचा ते जेव्हा गैरवापर करू लागले, तेव्हा त्यांना ठार मारण्याशिवाय देवांकडे पर्याय उरला नाही. प्रश्न व्यक्तीचा नव्हताच मुळी. प्रश्न होता कर्तृत्वाचा. 

फक्त दैत्य-दानव-राक्षसांचीच उदाहरणे तरी कशाला द्यायची? खुद्द देवनायक इंद्राने तरी काय कमी व्यभिचार केला? कमी अन्याय केला? इंद्र अहिल्येच्या रूपाला भुलून तिला फसवण्यासाठी गौतमाचं रूप घेऊन आला, आणि अहिल्या त्याला फसली. याबद्दल गौतमानी अहिल्येला दगड बनवलं एवढी गोष्ट आपल्याला माहिती असेल, पण गौतमानी इंद्राला त्याच्या अपराधाबद्दल केलेली शिक्षा तर त्याहून किळसवाणी व भीतीदायक आहे. जिज्ञासूंनी स्वतः शोध घेऊन ती जाणून घ्यावी. 

धर्म-जात-जन्मावर नव्हे, तर फक्त आणि फक्त कर्मावर माणसाची पारख करण्याची इतकी मोठी परंपरा असलेल्या देशाला सेक्यूलरिझ्म इतरांनी शिकवण्याची काहीच आवश्यकता नाही. 

सेक्यूलरिझ्मच्या नावाखाली आज विशिष्ट जाती-जमातींना राजकीय पाठिंबा दिला जातो हे दुर्दैव आहेच, पण खरा प्रश्न त्याहीपेक्षा खोलातला आहे. 

खरं म्हणजे "secularism" म्हणजे केवळ पूर्वापार चालत आलेल्या जीवनपद्धतीला दिलेला नकार आहे. आपण आयुष्य सेक्यूलरपणे व्यतीत करतो, म्हणजे काय रे बाबा? असं कुणा आधुनिक सेक्यूलराला विचारलं, तर त्याला खरं म्हणजे काहीच उत्तर देता येणार नाही. फार फार तर "कुठल्याही विशिष्ट धर्माला मी प्राधान्य देत नाही" ही पुस्तकी व्याख्या त्याला सांगता येईल, पण आपण काय करत नाही, यावर आयुष्य उभारता येत नाही. आयुष्य जे आहे त्याचा विचार करून उभं करावं लागतं, जे नाही त्याचा नाही. 

निधर्मीपणे जगणं हे liberal arts मध्ये डिग्री मिळवलेल्या वाचावीरांना वाटतं तितकं सोपं नाही. मुळात धर्म म्हणजे काहीतरी जुनाट, प्रतिगामी, त्याचा "आत्ताच्या जगाशी" काही संबंधच नाही, ही समजूतच चुकीची आहे.

फक्त चुकीची नाही, तर घातक आहे, कारण "आपण निधर्मी आहोत" या समजुतीने आपला "आत्ताच्या जगातला" खरा धर्म झाकून ठेवायला मदत होते. 

स्वार्थीपणा, ऐदीपणा, अहंकारी वृत्ती, थोडक्यात सांगायचं तर हिंदू तत्वज्ञानात वर्णन केलेल्या षड्रिपूंवर आजचा समाजधर्म आधारलेला आहे. हिंदू तत्त्वज्ञानात राम, हनुमान, शंकर इ. पौरुषत्वाचे, आणि दुर्गा, पार्वती, सीता इ. स्त्रीत्वाचे आदर्श मानले जातात. आजच्या समाजधर्मात मात्र बलोन्मत्त रावण आणि मर्यादाहीन शूर्पणखा हे पौरूषत्व आणि स्त्रीत्वाचे आदर्श झाले आहेत. 

आपल्याला हवे ते आपण घ्यावे, बाकीचं ज्याचं तो बघून घेईल, ही वृत्ती मनुष्यात आधीपासून आहेच. फरक एवढाच, की पुरातन धर्मपद्धतींनी या वृत्तीतली कुरूपता पाहून "लहानपण देगा देवा" म्हटलं, आणि या नैसर्गिक पण कुरूप प्रवृत्तींपासून दूर कसं राहता येईल, याचा विचार केला, आणि आजच्या विज्ञानाधारित "शहाण्या" मानवतेने या पूर्वजांना मूर्ख ठरवून स्वत‌:ला भौतिकतेच्या, म्हणजेच षड्रिपूंच्या हवाली केले. आपल्या पूर्वजांनी षड्रिपूंचं दमन आणि नियमन करण्यात धन्यता मानली, तर आपण इंद्रीयसुखांच्या मागे लागून स्वरूपालाच नव्हे तर स्वरूपाच्या संकल्पनेलाही विसरून बसलो. आपल्या मनात येणारे विचार, प्रकट होणाऱ्या इच्छा म्हणजेच आपण, हा गैरसमज दृढ झाल्यामुळे, या मनोमय कोषामागचा विज्ञानमयकोषही आपण विसरून बसलो, तर त्याहीमागच्या आनंदमयकोषाची तर गोष्ट दूरच राहिली. 

आपल्या इच्छा पुर्या करून घेणे, हाच जिथे धर्म, तिथे या पुरातन विचारधारांना थारा मिळणार असा? "विज्ञान" भौतिक जगात कैद झाल्यामुळे आपल्या मनाच्या पलीकडेही काही आहे, हे म्हणणारेच वेडे ठरले. शहाणे ठरले ते मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडणारे, इच्छांचा मागोवा घेण्याऐवजी इच्छांच्या मागोमाग जाणारे. 

संस्कृत भाषेने धर्माची "धारयते इति धर्म:" अशी मोठी सुंदर व्याख्या केलेली आहे. जो धरून ठेवतो, एकत्र बांधून ठेवतो, तो धर्म. ज्या सूत्राच्या आधारावर एखादी गोष्ट उभी असते, तो त्याचा धर्म. एखाद्या गोष्टीचं जे तत्त्व, तो त्याचा धर्म. 

या अर्थाने पाहिलं, तर धर्म नाही, अशा खर्या अर्थाने "निधर्मी" असं या जगात काहीच नाही. कुणीच नाही. असूच शकत नाही.

माणसांचं पाहिलं, तर ज्या गोष्टीने आपल्याला आनंद मिळतो (सुख नव्हे, आनंद) तो आपला धर्म, अशी ढोबळ व्याख्या आपण करू शकतो. यात सर्व मनुष्यजातीला लागू पडणार्या काही गोष्टी आहेत, व आपापल्या स्वभावानुसार आपल्याला लागू पडणार्याही काही गोष्टी आहेत. एखाद्या गायकाला जो आनंद एखादी सुंदर सुरांची लकेर घेताना होतो, तोच आनंद एखाद्या फुटबॉलपटूला एखादा सुरेख "गोल" मारल्यावर होतो. अगदी तोच आनंद - त्यात डावं-उजवं काहीही नाही. पण त्याच गायकाला फुटबॉल च्या मैदानात उतरवलं, किंवा खेळाडूला मैफिलीत गायला लावलं, तर दोघांचेही हातपाय कापायला लागतील. 

श्रेयान्स्वधर्मो विगुण: परधर्मात्स्वनुष्ठितात्
स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: 
(भगवद्गीता ३:३५)

अख्ख्या गीतेचं सार म्हणता येईल असा हा श्लोक हेच सांगतो. 

सगळ्यांची आपापली वाट आहे. सगळ्यांचा आपापला धर्म आहे. याचा हिंदू, ख्रिस्ती, ज्यू, मुस्लिम वगैरै संघटित "धर्मांशी" काहीही संबंध नाही. हा सर्वस्वी ज्याचा त्याचा, आपला-आपला मामला आहे. 

मात्र झालंय असं, की हा "स्वधर्म" शोधायची वाटच आधुनिक विज्ञानाने बंद करून टाकलेली आहे. इतरांना सिद्ध करून दाखवता येईल, पुन्हा पुन्हा सिद्ध करून दाखवता येईल, तेच खरं, या संकुचित प्रवृत्तीनी ही वाट कशी चालता येईल? ही वाट चालायला कळप-वृत्ती सोडायला लागते. दुसरा म्हणतो, अनेक लोकं म्हणतात ते खरं ही समज सोडावी लागते. आपल्याला कशातून आनंद मिळतो, कशातून समाधान मिळतं, हे दुसरा कुणीही आपल्याला कसं सांगू शकेल? दुसर्याला आनंद देणारी गोष्ट आपल्याला आनंद देईल कशावरून? आईच्या पोटात नऊ महिने एकत्र वाढलेल्या जुळ्या भावंडांत सुद्धा एकाला जे आवडतं ते दुसर्याला आवडेलच असं सांगता येत नाही, तर करोडोंच्या जनसमुदायाला एकच गोष्ट कशी आवडू शकेल? शक्यच नाही ते. 

निधर्मतेच्या नावाखाली आपण थोडंफार कमावलं असेलही, पण जे गमावलं ते त्यापेक्षा कैक पटीनी जास्ती आहे. जे सुदृढ असतं ते धार्मिक असतं. जे आपल्या पायांवर उभं असतं ते धार्मिक असतं. तान्हं बाळ रांगायला आणि त्यानंतर चालायला लागतं, कारण तो त्याचा धर्म आहे. २ वर्षं झाली तरी बाळ चालायला लागलं नाही, तर तो दोष मानला जातो. आपलं आपण बोलायला लागलं नाही, तर तो दोष मानला जातो. याला वैद्यकीय भाषेत काहीही म्हणोत, पण त्या बाळाला धरून ठेवणारं सूत्र हवं तसं काम करत नाही, हाच त्याचा अर्थ. जे धार्मिक आहे, त्याची त्याच्या स्वरूपाशी नाळ घट्ट बांधलेली असते. जे धार्मिक असतं, ते स्वरूपाधिष्ठित असतं. आणि हिंदू परंपरेत स्वरूपाधिष्ठित असण्यापेक्षा उजवं काहीच नाही. 

रामरक्षेत रामाला उद्देशून 
"काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं" 
अशी एक ओळ आहे. इथे रामाला पूजापाठ करताना दाखवायचा हेतू नसून, त्याची स्वरूपाधिष्ठितता दाखवायचा हेतू आहे. 

निधर्मतेच्या नावाखाली आपण आपली सुदृढता गमावून बसतो आहोत, स्वरूपाधिष्ठितता गमावून बसतो आहोत. याला आधी सांगितल्याप्रमाणे भारतीय उपाय म्हणजे रामाला केवळ मंदिरात नाही, केवळ अयोध्येत नाही, तर मना-मनात आणून बसवणं. रामाच्या सत्य स्वरूपाचं ध्यान करणं. 

3 Idiots मधला रॅंचो म्हणतो, "Excellence का पीछा करो. Success झक मारके तुम्हारे पीछे आएगी". 

रामायणातला राम आणि चंदेरी पडद्यावरचा रॅंचो यांची ही तुलना थोडी विनोदी वाटली, तरी excellence च्या मागे धावणं हेच रामाच्या सत्य स्वरूपाचं खरं ध्यान आहे. प्रत्येक कृतीत उत्तमतेच्या मागे धावणं, म्हणजेच रामाच्या सत्य स्वरूपाचं ध्यान. 3 Idiots मधला रॅंचो खरं म्हणजे गरीब घरातून, कठीण परिस्थितीतून पुढे आलेला असतो. पण त्याचा उत्तमतेचा ध्यासच त्याला त्याच्या गंतव्यस्थानी घेऊन जातो (आणि करीना कपूर बरोबर त्याची जोडी पण जुळवून आणतो). नाईलाज म्हणून केलेल्या नामघोषा ऐवजी हा उत्तमतेचा रामघोष जर भारताच्या घरा-घरांत घुमायला लागला, तर भारत राजकीय महासत्ता व अध्यात्मिक विश्वगुरू व्हायला असा कितीसा वेळ लागेल!

- तन्मय विराज टिकेकर
२ जून २०२४

No comments:

Post a Comment