Tuesday, June 11, 2024

नृसिंह स्तोत्र: चेतनेची उपासना व सचेतनातील अभेद

 मना सज्जना भक्तिपंथेचि जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे

भक्तीची मजा अशी आहे, की एका उपास्य दैवताला खोलात खोल, सूक्ष्मात सूक्ष्म रूपांत भेटत गेलात, की कुठल्याही दैवताला तशीच गळामिठी मारता येते. भूगर्भातल्या एखाद्या प्रचंड जलाशयाला जसं कुठेही खोदलं तरी तेच पाणी लागतं, तसं कुठल्याही दैवताची उपासना आपल्याला त्याच भक्तीच्या जलाशयात घेऊन जातेमात्र भक्तीची मेख अशी आहे, की हे पाणी लागायला "खुद" मध्ये तेवढी "खुदाई" करायची तयारी हवी. फक्त वरवरचे पापुद्रे सोलले, तर कुठेही खोदलं, आणि कितीही ठिकाणी खोदलं, तरी काही उपयोग नाही.

माझी हिंदूधर्माची पहिली ओळख मारुतीपासून झाली. लहानपणी झोपताना आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींतून हनुमान भेटला, आणि आयुष्यभराचा friend-philosopher-guide मिळाल्यासारखं वाटलं, ते आजतागायत तसंच वाटतं.

हिंदूधर्माच्या मूलतत्त्वांची ओळख करून घ्यायला हनुमानासारखा दुसरा मार्गदर्शक नाही. मारुतीच्या उपासनेतूनच मला राम भेटला, शंकर भेटला, वराह-नरसिंहाची जोडगोळी भेटली. रामाच्या भेटीतून नवदुर्गांची ओळख झाली. शंकरावर विचार करता करता स्कंद म्हणजेच कार्तिकेयाशी ओळख झाली, सती-पार्वती-दक्षाची भेट झाली, गणपतीची गणेशोत्सवात झाली होती त्यापेक्षा खूप जास्त ओळख झाली. तिथून पुढे इंद्र-वरुण-अग्नी-वायू . वैदिक देवांची ओळख झाली, त्यातून अदिती-कश्यप भेटले, पंचमहाभूते भेटली.

या सगळ्या प्रवासात मारुती पाठिराखा म्हणून कायम सोबत होता. गडा-झाडांवर उड्या मारणारा, जोरात भुभु:कार करून ऋषीमुनी दैत्य-दानव दोघांनाही पिडणारा, "हुप् कार करोनी आकाशात उडणारा", चंचल तरीही स्थितप्रज्ञ, असा हा देव माझ्या मनात अगदी पहिल्यापासून घर करून राहिला आहे

हल्लीच्या जगात ADHD चं निदान करण्यात आलेल्या सर्व मुला-मुलींना "औषधे" देऊन गपगार करण्यापेक्षा त्यांची हनुमानाशी ओळख करून दिली तर सर्वांचंच बरं होईल, असं माझं प्रामाणिक मत आहे. मला खात्री आहे, की मी लहान असताना जर हे ADHD चं भूत आपल्या मानगुटीवर बसलेलं असतं, तर मला नक्कीच ADHD चा "रुग्ण" समजून त्यावर "उपचार" केले गेले असते. त्याऐवजी मला हनुमान भेटला, हे माझं सौभाग्य.


सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे

हनुमानाच्या चळवळेपणामागे खूप मोठा अर्थ आहे. एका जागी शांत बसून राहता येणं, हा गुण आहेच. पण म्हणजे कायम सगळ्यांनी शांतच बसून राहिलं पाहिजे, ही अपेक्षा धरणं मूर्खपणाचं आहे

अशा वृत्तीतून फोफावते, ती नम्रता नव्हे, तर अहंकार. शिकवण्यात रस नसलेल्या शिक्षकांना, मुलांचं संगोपन करण्यात रस नसलेल्या पालकांना, आणि सृजनशीलतेत रस नसलेल्या कारखानदारांना सुरळीत, एका रेषेत चालणारे गुलाम मिळावेत, यासाठी केलेली ही गलिच्छ धडपड आहे

ज्यांना शांत बसायचंय त्यांनी जरूर बसावं - "शांताकारं" हे तर विष्णुचं प्रमुख नाव आहे - पण शांत बसणे ही चळवळीचीच सुफळ संपूर्ण अवस्था आहे, हे ध्यानात ठेवलं पाहिजे

चळवळ होत असताना ती जबरदस्तीने गप्प करणं, हे कुणी शांत बसलेला असताना त्याला धक्के मारून उठवण्याइतकंच त्रासदायी. कच्ची फळं तोडायला कष्ट घ्यावे लागतात. पिकलेली फळं मात्र अलगदपणे हातात येतात. तसंच, अंगभूत चळवळ पूर्णत्वाला गेली तरच लहानपणीच्या स्वैर, कुणाला जुमानणाऱ्या नारायण सूर्याजीपंत ठोसराचा मोठेपणी समर्थ रामदास होतो. शांत बसणं म्हणजे चळवळ जबरदस्तीने बंद करणं, ही समजूत अत्यंत घातक चुकीची आहे. जॉर्ज ऑर्वेल च्या "1984" या प्रसिद्ध दु:स्थापनदर्शी (dystopian) कादंबरीचा हाच तर गाभा आहे.

 

कदा तो जनी पाहतांही दिसेना, सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना

चळवळ जीवंतपणा दर्शवते. इंग्रजी भाषेतला "animal" हा अतिपरिचयादवज्ञा झालेला शब्द खरं म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे. या शब्दामधलं "anim" हे मूलरूप "animism" "animated" या शब्दांतही दिसतं. हिंदू तत्वज्ञानात सचेतन आणि अचेतन या ज्या अत्यंत महत्त्वाच्या संज्ञा आहेत, त्यातली "चेतना" हाच animal मधल्या "anim" या मूलरूपाचा अर्थ

पाश्चात्यांचा "anim" म्हणजेच हिंदूंची "चेतना". जे सचेतन आहे, ते "animated" आहे. स्वयंप्रेरणेने, सचेतनपणे वागणारे, ते "animal".

ज्या पुरातन ग्रीक आणि संस्कृत भाषेतील साधर्म्यामुळे "proto-indo-european" भाषेचा अभूतपूर्व शोध लागला, ते साधर्म्य या दोन संस्कृतींच्या धार्मिक पद्धतीतही आहे

ग्रीकांचं pantheon (देवगण) आणि वैदिक हिंदू देव-देवतांमध्ये कमालीचं साधर्म्य आढळतं, कारण या दोन्ही संस्कृती proto-indo-european संस्कृतीपासूनच उत्क्रांत झाल्या, आणि animism वर आधारित, म्हणजेच चेतनेपुढे नतमस्तक होणाऱ्या होत्या

ग्रीकांचा जसा झ्यूस आहे, तसाच आपला इंद्र आहे. त्यांचा जसा औरानोस (युरेनस) आहे, तसाच आपला वरूण आहे. त्यांची जशी गाएया, तशीच आपली भूदेवी. त्यांच्या पर्सियस, हेराक्लिस, थीसीयस, अकीलीस या "heroes" सारखेच आपले राम, कृष्ण, वामन, परशुराम हे "अवतारआहेत. स्थलकालपरत्वे या दोन धर्मांत फरक पडले आहेत, पण मुळातली जगाकडे पाहण्याची दृष्टी एकच.

आजच्या काळात पाश्चात्त्य जगात "animism" हा शब्द बहुतेक वेळा हेटाळणीच्या सुरातच बोलला जातो, कारण आधुनिक विज्ञानात, दिसणाऱ्या, मोजमाप करता येणाऱ्या चेतनेला स्थान नाही, त्यामुळे त्यावर आधारित संस्कृती परंपरेलाही तिथे स्थान नाही. हिंदुस्थानात सचेतन-अचेतन या संकल्पनांचं महत्त्व अजूनही टिकून आहे, पण पाश्चांत्त्यांचं अनुकरण करण्याच्या आपल्या (जबरदस्तीने लादल्या गेलेल्या) सवयीमुळे त्याचाही ऱ्हास होत चालला आहे.


तया निर्विकल्पासि कल्पीत जावे, परि संग सोडूनि सूखे रहावे

या चेतनेचं हिंदू नाव म्हणजेच विष्णूनाभिकमलात ब्रह्मदेवाला धारण केलेला, महादेव शंकरालाही वंदनीय ठरलेला हा परमात्मा सर्व प्राणीमात्रांचे मूळ आहे

चेतनाधारित (animist) संस्कृतींचं वैशिष्ट्य हेच, की त्यांनी निरपेक्ष (objective) ज्ञानामागे लागता सारं जग संपूर्णत: सापेक्ष (subjective) मानवी दृष्टिकोनातून पाहिलं, हा संपूर्ण मानवी दृष्टिकोन आहे तरी काय, हे शोधण्यावर भर दिलावरूण, इंद्र, अग्नि . निसर्गदैवतांचं तत्त्व आपण मानवी रूपकांतून उलगडलं. विष्णू, शंकर . सर्वव्यापक तत्वांना "नेति नेति" म्हणतानाही मानवी मनाला कळतील वळतील अशा नामरूपांनी संबोधलंनिरपेक्ष ज्ञान जर असलंच तरीही ते आपल्याला दिसणार मानवतेच्या चष्म्यातूनच, हे पक्कं ओळखून आपण मानवी संवेदना उंचावण्यावर भर दिला. सापेक्ष ज्ञानाची परिणतीच निरपेक्ष ज्ञानात होते, हा अनुभव घेतलेल्यांनी आपल्या वागण्यातूनच इतरांना ही वाट चोखाळायला उद्युक्त केलं. कुणालाही याची जबरदस्ती करावी लागली नाही.

आपली पुराणे देवांचं, म्हणजेच निसर्गतत्वांचं मानवीकरण करून गोष्टी सांगतात, कारण निरपेक्ष ज्ञान कमावण्यापेक्षा माणसाची वागणूक कशी सुधारता येईल, समाज बलवत्तर कसा ठेवता येईल, चांगलं आयुष्य कसं जगायचं हे सामान्यजनांना कसं सांगता येईल, यावर आपण भर दिला. सृष्टीची कोडी उलगडण्याऐवजी आपण "स्व" ची कोडी उलगडण्यावर भर दिला. "स्व" मध्ये सृष्टीसुद्धा येतेच, हा चेतनाधारित विचारधारांचा अतिशय महत्त्वाचा शोध आहे. 

याच्या उलट, चेतनेचं अस्तित्वच अमान्य करणारे पाश्चात्त्य विज्ञान षड्रिपूंच्या आहारी गेले. निरपेक्ष ज्ञानाच्या मागे पळताना हा पळणारा "मी" आहे तरी कोण, याचा शोध बाजूला राहिला. त्यांना हवं होतं निरपेक्ष ज्ञान, कारण सापेक्ष ज्ञानाचा गैरवापर करून हुकूमशाही चालवणाऱ्या धर्मसत्तांची (theocracy) त्यांना सवय होती. त्यामुळे चर्मेंद्रियांद्वारे आणि बुद्धिखलाद्वारे मिळणाऱ्या "निरपेक्ष" ज्ञानाला त्यांनी प्राधान्य देणं अगदी स्वाभाविक होतं. "मी" ला मूलभूत मानूनच पाश्चात्त्य विज्ञान अजूनही सृष्टीची कोडी उलगडायला पाहतं. Consciousness च्या पायरीवर आधुनिक विज्ञान गेली शंभरहून अधिक वर्षे अडकून राहिलेले आहेपण त्या consciousness चे गोडवे आपल्या वेदांनी हजारो वर्षांपूर्वीच गायलेले आहेत

"मी" आणि "माझ्याभोवतीची सृष्टी" यांमध्ये स्पष्ट भेद केल्यामुळेपाश्चात्त्यांचा सगळा कारभार चालतो सत्तेच्या, "मी" ची सत्ता "माझ्याभोवतीच्या सृष्टीवर" प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातूनयाउलट, हा "मी" स्वार्थी आहे हे जाणून "स्व"चा शोध घेणारी चेतनाधारित हिंदू विचारसरणी सकल प्राणीमात्रांतच नाही तर सकल चराचरात केशवालाच पाहते. गाईला आपण आई मानतो, वानर हनुमानाचे साथीदार म्हणून त्यांच्या मर्कटलीला खपवून घेतो. इतकंच नव्हे तर कधीकधी आपल्याच माणसांचा जीव घेणाऱ्या वाघ-सिंहांनाही आपण देवतांची वाहनं म्हणून गौरवलं, आणि अस्वलांना जांबुवंताच्या रूपात राम आणि कृष्ण दोघांच्याही आयुष्यात गोवलं.


सदा सर्वदा देव सन्नीध आहे, कृपाळूपणे अल्प धारीष्ट पाहे

सर्व जीवांतल्या चेतनेचा विष्णू मूलाधार असल्यामुळे अधर्मनिर्दालन करण्यासाठी विष्णूला त्या त्या परिस्थितीला साजेसं कुठलंही रूप घेता येतं. विष्णूच्या अनेक अवतारांमध्ये मत्स्य, कूर्म . पूर्णतः प्राणी असलेलेही अवतार आहेत, वराह, नृसिंह, हयग्रीव . अंशतः प्राणी अंशत‍‌: मनुष्य असलेलेही अवतार आहेत, आणि वामन, परशुराम, राम, कृष्ण असे पूर्णत: मानव असलेलेही अवतार आहेत. फक्त चार मानवी अवतार जरी पाहिलेतर त्यांच्यामध्ये तात्त्विक नसला तरी भौतिक फरक खूप आहे, कारण त्या त्या वेळच्या परिस्थितीच्या अनुसार हे अवतार घेतलेले आहेत.

विष्णूच्या पहिल्या दोन, म्हणजे मत्स्य कूर्म अवतारात धर्मसंस्थापनेचा हेतू असला, तरी कुणा असुराला वा दैत्याला मारण्याचा हेतू नाही. त्यापुढचे दोन अवतार, म्हणजेच वराह नृसिंह अवतार, हे मात्र दोन विशिष्ट असुरांना ठार करण्यासाठीच घेतलेले आहेत.

ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचं वरदान मिळत नाही, हे पाहिल्यावर हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या दोन असुरबंधूंनी अमरत्वाच्या जितक्या जवळ जाता येईल तितक्या जवळ जाणारे वर मागितले. हिरण्याक्षाने मानव, पशु, देवांपासून अभय मागितले, तेव्हा विष्णूने ना पशू, ना मानव, ना देव अशा वराह अवतारात त्याचा वध केला. लहान भावाच्या मरणाने चवताळलेल्या हिरण्यकश्यपूने त्याच्याही पुढे जाऊन दिवसा वा रात्री, घरात वा घराबाहेर, जमिनीवर वा हवेत, अस्त्राने वा शस्त्राने, जिवंत अथवा मृत गोष्टींने, आणि ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या कुठल्याही गोष्टीने मरण येणार नाही, असा वर प्राप्त करून घेतला.

अप्रत्यक्षपणे हिरण्यकश्यपूच्या अहंकारानेच आवाहन केलेल्या पशु-मानव-संकर स्वयंभू नृसिंहाने स्तंभातून जन्म घेतला, आणि संधिकाली (दिवसा नाही, रात्री नाही), स्वतःच्या मांडीवर (जमिनीवर वा हवेत नाही), घराच्या उंबरठ्यावर (घरात नाही, घराबाहेरही नाही), स्वतःच्या नखांनी (जिवंत वस्तूनेही नाही, मृत वस्तूनेही नाही, शस्त्रास्त्रानेही नाही) हिरण्यकश्यपूचा कोथळा काढला.


अनन्यास रक्षीतसे चापपाणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी

अधर्माने कुठलंही रूप धारण केलं आणि कितीही शक्ती कमावली, तरी धर्माकडे त्याचं उत्तर असतं. मात्र कर्मठपणे कुठलातरी एकच पंथ पाळता, स्थलकालसुसंगत रूप घेण्याची लवचिकता अंगी बाणवायला हवी.

मारुतीच्या उपासनेमध्ये पंचमुखी मारुतीला विशेष महत्त्व आहे. या प्रतिमेतील हनुमान, नरसिंह, वराह, गरूड, आणि हयग्रीव हे पाच पशु-मानव संकर बाह्यरूपनिरपेक्ष चेतनेचेच प्रतीक आहेत. एकाच तत्त्वाची पाच उदाहरणे आहेत. हिरण्यकश्यपूसारख्या बलशाली, उन्मत्त दैत्याला लहान बाळासारखं मांडीवर घेऊन आपल्या नखांनी त्याचं पोट फाडणाऱ्या नरसिंहाबद्दल मला आधीपासून कुतूहल होतंच, पण पंचमुखी प्रतिमेमध्ये मारुतीच्या बरोबर नरसिंहाला पाहून एकदम मनात प्रकाश पडला, आणि मारुती-नरसिंहातला अभेद लक्षात येऊन नरसिंहाबद्दलची आपलेपणाची भावना आणखीनच दृढ झाली.

मनुष्य पशू यांना जगवणारी चेतना तीच आहे. फरक आहे तो फक्त देहरूपाचा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या क्षमतांचा, बलाबलांचा. नरसिंहाची नखं रामाकडे नाहीत, तसेच रामाचे धनुष्यबाण मारुतीकडे नाहीत. कृष्णाचे सुदर्शनचक्र वराहाकडे नाही, तर मारुतीची लोहदंडासारखी शेपूट शंकराकडे नाही.

मूलरूप एकच आहे, आविष्कार अनेक आहेत.

प्रत्यक्ष अवतार, आणि जिवलग सख्यासारखे सेवक, असं पंचमुखी मारुतीच्या पाचही मुखांचं विष्णूशी, म्हणजेच चेतनेशी, "anim" शी, जवळचं नातं आहे. ही चेतना जागृत ठेवण्याची, आपल्या अंतरंगातील "खुदाई" कधीही थांबवण्याची आठवण शिकवण पंचमुखी मारुती आपल्याला देतो. 

"अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम् देहमाश्रित:

प्राणापानसमायुक्तं पचाम्यन्नम् चतुर्विधं" 

(भगवद्गीता १५:१४)

हे एकदा कळलं आणि वळलं, की खुद काय, खुदा काय, कोणीच ही खुदाई अडवू शकत नाही. भगवद्गीतेचा दहावा "विभूतियोग" अध्याय हेच सांगतो. या अध्यायातील अनेक श्लोक इथे नमूद करता येतील, पण लांबण लावायला नको म्हणून मनाला आवर घालतो आहे. जिज्ञासूंनी गीतेचा दहावा अध्याय जरूर वाचावा.

याच विचारातून सुचलेलं हे नृसिंहस्तोत्र इथे post करीत आहे:

नृसिंह स्तोत्र

 

अनन्तसुखदं अमूर्तमूर्तं
द्वन्द्वातीतं भक्तरक्षकं
उत्तमोन्नतं धर्माधारं
नृसिंहरूपं तं प्रणमामि ||
 
भीषणरूपं विश्वाधारं
करालदन्तं गूढविरूपं
अनिकेतं अमलं अविभक्तं
नृसिंहरूपं तं प्रणमामि ||
 
मातुरंकयोर्शिशुमिव शमनं
तथा विष्णुना हिरण्यदमनं
अविनाशिं अजमाविर्भूतं
नृसिंहरूपं तं प्रणमामि ||
 
अनरं अपशुं अनस्त्रशस्त्रं
अकालस्थानम् अमृत्युजन्मं
नखाग्रशस्त्रं दैत्यकन्दनं
नृसिंहरूपं तं प्रणमामि ||
 
अजं स्वयंभुं अयोनिजन्मं
मदान्धदैत्त्यं हतमविरोधं
भक्तरक्षणं दुष्टमर्दनं
नृसिंहरूपं तं प्रणमामि ||
 
विश्वविनायक रामं विरजं
अनिरुद्धं भय-तृष्णा-शमलं
अद्भुतरूपं अद्भुतदेहं
नृसिंहरूपं तं प्रणमामि ||


महद्रूप नृसिंह भगवान की जय!


- तन्मय विराज टिकेकर

११ / ०६ / २०२४

No comments:

Post a Comment