Friday, July 19, 2024

काही आधुनिक उखाणे


वैधानिक चेतावणी: पुढील उखाण्यांमध्ये "xxx" हे शिवी म्हणून नव्हे, तर नवर्याच्या नावाच्या जागी वापरले आहे. आत्ताच्या बायकांना कदाचित कळणार नाही, म्हणून आधीच खुलासा करून ठेवतो आहे. आयत्या वेळी तुम्ही नवर्याच्या नावाच्या जागी सवयीची शिवी घातली तर आम्ही जबाबदार राहणार नाही. 


नातेवाईक जमले सारे
तोंड झालं गोड,
लग्न करतोय आपण xxx,
आता तरी तिचा नाद सोड!!

(त्याने तिचा नाद सोडल्याची खात्री असेल तरच हा उखाणा म्हणावा. भर लग्नातून उठून नवरा दुसरीबरोबर पळून गेला तर आम्हाला जबाबदार ठरवू नये.)


xxx साठी सोडलं घर,
आणि सोडला गाव,
नेहमी शिवीनेच हाक मारते,
आजच घेतेय नाव ||


रेडिमेड घातली नऊवारी,
कष्टाने सांभाळत्ये पदर,
xxx ची मात्र शेवटपर्यंत
मनापासून ठेवेन कदर ||

(हा उखाणा म्हटला तर शेवटपर्यंत कदर खरंच ठेवावी, फक्त तोंडदेखलं म्हणून मोकळं होऊ नये)


देखणा दिसतोय xxx
थोरामोठ्यांची गर्दी दाटली
Situationship वाटली होती,
इथे मुहूर्ताची वेळ येऊन ठाकली ||

(हा उखाणा तो देखणा दिसत नसला तरीही म्हणावा, थोरामोठ्यांवर चांगलं impression पडतं)


"लग्न? Eww!" करता करता
"इश्श" पर्यंत आले,
शेवटी उरले xxx राव,
बाकी सगळ्यांचे काटले ||

(काटले गेलेले बाकीचे सगळे लग्नाला आले असतील तर आवर्जून हा उखाणा म्हणावा)


College साठी आले होते,
नोकरीसाठी राहिले,
पण xxx शी लग्न केल्यावरच,
हे गाव मला "माझे" वाटले ||

(सगळेच आधुनिक उखाणे विनोदी असावेत असे नाही. कवीला माणुसकीच नाही असे कुणीही म्हणू नये.)

हे उखाणे कुणीही हवे तसे वापरायला आमची काहीच हरकत नाही. परंतु उखाणा वापरला तर कृपया तो स्वतःचा म्हणूनच मिरवावा. मोठे नातेवाईक रागावले तर सोयीस्करपणे आमच्या डोक्यावर खापर फोडू नये. 

यामध्ये पुरुषांसाठीचे उखाणे नाहीत, फक्त बायकांसाठीचे उखाणे आहेत, हे चाणाक्ष लोकांच्या ध्यानात आले असेल. याचं कारण sexism किंवा misogyny हे नसून, पुरुषांनी उखाणे घेणे, किंवा "नाव घेणे", हा अत्यंत मूर्खपणाचा प्रकार आहे, असे आमचे प्रामाणिक मत आहे. 

पूर्वीच्या काळी पत्नीला पतीचे नाव घ्यायची मनाई होती, पण पतीला पत्नीचे नाव घ्यायची मनाई नव्हती. म्हणून बायकोने नवर्याचे "नाव घेण्याला" त्या काळी अर्थ होता. आता बायका पुरुषांना नावानेच हाक मारायला लागल्यानंतर मुद्दाम "नाव घेण्याला" काहीच अर्थ उरलेला नाही. 

तरी बायका - अगदी फेमिनिष्टातल्या फेमिनिष्ट बायका सुद्धा हो - "मजा वाटते" म्हणून उखाणे घेत असतात. नवर्यासाठी बायकोने स्वयंपाक करणे, नवर्याचे कपडे बायकोने आवरून ठेवणे, हे आम्हाला कमीपणाचे वाटते, हे ठणकावून सांगणार्या या साळकाया-माळकायांना नाव घेण्याच्या बाबतीत मात्र ही जुनी, बुरसटलेली पद्धत कशी सांभाळावीशी वाटते, हा एक खरोखर विचार करण्याजोगा प्रश्न आहे. 

नाव घेण्यामागची कारणमीमांसा ज्यांना लक्षात आली आहे, त्यांना पुरुषांनी नाव घेण्याला काहीच अर्थ नाही हे लक्षात आले असेल. पण पुरुषी वर्चस्वावर आधारलेली "नाव घेण्याची" संस्था सोडून देण्याऐवजी बायका आपणहून त्यात हिरिरीने भाग घेतात, स्वतः त्यातून बाहेर पडण्याऐवजी पुरुषांनाही त्यात ओढून घेतात, आणि पुरूषही काही विचार न करता, "बायकोला बरं वाटावं म्हणून", किंवा "समतेच्या" नावाखाली या मूर्खपणामध्ये सहभागी होतात, यामध्ये आधुनिक फेमिनिझ्म चे खूप मोठे सूत्र दडलेले आहे. असो. विचार करणार्यांना रान मोकळे आहे. नाहीतर काय, सरड्याची धाव कुंपणापर्यंत.


- तन्मय विराज टिकेकर 
१८ जुलै २०२४

No comments:

Post a Comment