Monday, February 10, 2025

गुरू शमा भाटे दिग्दर्शित 'परंपरा के पदचिह्न' - एक अनुभव व अभिप्राय

मला माझ्या दहावीत घडलेली एक घटना अजूनही तशीच आठवते. नॅशनल डिफेन्स अकॅडमी, अर्थात NDA ची पासिंग आऊट परेड पाहायला आम्हाला शाळेतली मोठी मुले म्हणून घेऊन गेले होते. परेड आमच्या समोर आडव्या लाईनीत उभी होऊ लागली. आत्तापर्यंत प्रबोधिनीत संचलन केलं होतं, पण इथल्या संचलनाची शिस्त वेगळीच आहे, हे कळत होतं. 

एक एक करत सारे जवान आमच्या समोर लाईनीत येत गेले, आणि त्यांच्या त्यांच्या जागेवर सगळे आल्यावर त्यांनी एकदाच शेवटचं लेफ्ट - राईट वाजवलं, आणि जागच्या जागी उभे राहिले. त्या शेवटच्या एकसंध लेफ्ट-राईटच्या आवाजाच्या शिस्तीखाली आमची, आमच्या आसपासच्या बाकीच्या प्रेक्षकांची, अगदी लहान - लहान मुलांची देखील, बडबड एका झटक्यात थांबली. खाणारी तोंडेही क्षणभर चमकली आणि गप्प झाली. वामनाने जसे दोन पावलात तिन्ही लोक व्यापून टाकले होते, तसेच इथे या नव्या राष्ट्रसंरक्षकांनी दोनच पावलात आम्हा सर्वांच्या मनाचा ठाव घेतला होता. तिसऱ्या पावलासाठी मस्तक झुकवण्यापलीकडे काही उरलेच नव्हते. उत्तमता इथे सशस्त्र दुर्गेच्या रूपात असुरांचा वध करायला तयार झाली होती.

काल (०९/०२) गानसरस्वती महोत्सवातील शमा भाटे दिग्दर्शित 'परंपरा के पदचिह्न' नृत्यप्रयोग पाहताना पुन्हा पुन्हा मला जवळ जवळ अठरा वर्षांपूर्वी पाहिलेल्या त्या एका लयीत पडलेल्या जवानांच्या टापा ऐकू येत होत्या. त्या टापा जशा दुर्गेच्या, रणचंडीच्या होत्या, तशा या टापा होत्या शारदेच्या, सरस्वतीच्या. शिस्त तशीच होती, पण इथे युद्ध होते ते केवळ अमंगलाशी, असुंदराशी, अनुत्तमाशी. इथे झेंडा नव्हता. आपले लोक ओळखायला गायन - वादन - नृत्य कलांना झेंडा लागतच नाही. दाद जायची ती जातेच.

नृत्यप्रवण तबला मी फारसा ऐकलेला नाही, म्हणूनही असेल कदाचित, पण काल चारुदत्त फडक्यांनी वाजवलेला तबला मला तरी वर्षानुवर्षे आठवत राहील. इतक्या सफाईने ते तालाचे वजन पलटीत होते, इतक्या विविध मार्गांनी समेला शोधत होते, की नवनवोन्मेषशालीनी शारदेच्या या पदन्यासावर जणू शंकराचा डमरूच साथ करतो आहे, असे वाटावे. 

शमाताईंच्या रचनांची मूर्ती सशस्त्र युद्धसज्ज दुर्गेसारखी न दिसता शिवप्रिया पार्वतीसारखी मंगलमय दिसत होती, प्रशांत भासत होती. शत्रूच्या रक्ताने माखलेली नाही, तर एका आंतरिक प्रकाशाने उजळलेली वाटत होती. तिचे तेज प्रकाशदायी होते, चटके देणारे नव्हे. तिचा आवेश सुंदर होता, भीतीदायक नव्हे. तिच्या सौंदर्याला तिच्या तपाने कमी केले नव्हतेच, तर अनावश्यक, असुंदर, अनाठायी ते सारे जळून गेल्याने तिच्यात एका तप:पूत तेजस्विनीची मूर्ती लकाकत होती. तिची एकेका मात्रेने - नव्हे, एकेका मात्रेच्या अंशा-अंशाने भरत जाणारी मूर्ती मनात आत्ता सुद्धा रुंजी घालते आहे. 

- तन्मय विराज टिकेकर, १० फेब्रुवारी २०२५

No comments:

Post a Comment