Wednesday, February 12, 2025

गांधी, सावरकर, आणि Tyler Durden

लहानपणापासून उजव्या विचारसरणीत, हिंदूनिष्ठ वातावरणात वाढल्यामुळे मला सावरकर नेहमीच जवळचे वाटत आलेले आहेत. म्हणवून घ्यायचंच तर मी स्वतःला "सावरकरवादी" म्हणवून घेईन. पण उजव्या विचारसरणीत जी गांधीविरोधी मानसिकता साधारणतः असते, ती मला कधीच पटलेली नाही. 

"केवळ गांधींनी आणि गांधीवादानी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं" हे किती अंशी खोटं आहे, हे गांधीवादी म्हणवून घेणाऱ्यांना कळणार नाही. पण याउलट, गांधी या राजकीय व्यक्तिमत्त्वापलीकडच्या मोहनदास गांधी या माणसाचा द्वेष पण माझ्याकडून कधी झाला नाही.

आपल्या डाव्या - उजव्या मतभेदांमधे आपण गांधी, गांधीवाद, सावरकर, आणि सावरकरवाद, यांचा इतका गोंधळ करून ठेवलेला आहे, की त्यातून नीर आणि क्षीर वेगळं करणं अवघड होऊन बसलेलं आहे.

गांधीवाद पटत नाही म्हणून उजव्या विचारसरणीचे पुराणमतवादी हिंदू बरेचदा मोहनदास गांधींमधला शुद्ध भारतीय (Indic) परंपरेतला ऋषी पाहायचेच नाकारतात, आणि सावरकरवाद सोयीचा आहे म्हणून सावरकरांच्या बुद्धीची पूर्ण धग अंगावर न घेता, जाणतेपणी कच्च्या घड्यासारखे राहून "हिंदुत्व, हिंदुत्व" करत बसतात.

गांधीवाद आवडला नाही म्हणून गांधीच नाकारायचे, किंवा सावरकरवाद सोयीचा आहे म्हणून अर्धवट, निवडकच सावरकर बघायचे, हे दोन्ही उत्तमतेच्या नियमांत बसत नाही. 'उत्कट भव्य ते ते घ्यावे, मिळमिळीत अवघेचि फेकावे', असा साधा नियम या बाबतीत रामदासांनी घालून दिलेला आहे. कुणाचे आहे ते महत्त्वाचे नाही, काय आहे हे महत्त्वाचे, असा साधा सिद्धांत आहे.

गांधीवाद नाकारायचा तर जरूर नाकारा, पण आधी गांधी आणि गांधीवाद दोन्ही समजून घ्या, मग नाकारा. सावरकर पत्करायचे असतील तर जरूर पत्करा, पण आधी सावरकर आणि सावरकरवाद दोन्ही समजून घ्या, मग पत्करा.

डाव्या विचारसरणीच्या किंवा गांधीवादाच्या सद्यपरिस्थितीतल्या अनुयायांना सुद्धा हे लागू आहेच. जसा उजव्यांनी गांधी समजून न घेता गांधीवाद नाकारला आहे, आणि अर्धवट सावरकर समजून घेऊन त्यांना आपलं म्हटलेलं आहे, तसाच काहीसा प्रकार डाव्यांनी "vice versa" केलेला आहे. सावरकर नाकारायचे असतील त्यांनी जरूर नाकारावे. पण समजून उमजून नाकारावे. नकळता नव्हे.

गांधींनी भगवद्गीता वाचून त्यातून "गांधीवादी" अहिंसेचा, भौतिक अहिंसेचा अर्थ कसा काय काढला हे मला तरी अजून कळलेलं नाही. पण गांधींना पाठीशी घेऊन लढणाऱ्यांनी गांधी भगवद्गीतेला पाठीशी घेऊन लढत होते, हे विसरू नये. भगवद्गीता, एकूणात सनातन परंपरेची शिकवण म्हणजे मुळातच काहीतरी जुनाट, बुरसटलेली, निरुपयोगी वस्तू हीच ठाम समजूत घेऊन बसलेल्यांनी गांधीवादाचा टिळा लावू नये.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका प्रसिद्ध भाषणात त्यांनी म्हटलेलं आहे, "सावरकर माने त्याग. तितीक्षा. तिलमिलाहट." आता यातलं कुठलं विशेषण मोहनदास गांधी या माणसाला लागू होत नाही, हे मला तरी कळलेलं नाही.

रूमीने त्याच्या एका कवितेत म्हटलंय, की बरे आणि वाईट यांपलीकडे एक उघडे माळरान आहे; तिथे मी तुझी वाट बघतो आहे. तसेच गांधीवाद आणि सावरकरवादांच्या पलीकडेही एक मोकाट माळरान आहे. हे माळरान आहे Fight Club मधल्या ओसाड, उदास Tyler Durden चे.

ज्यांनी Fight Club हा चित्रपट पाहिलेला नाही, त्यांना मी तो बघून यायला १३९ मिनिटांचा ब्रेक देतो. ज्यांना पिक्चर माहिती आहे, त्यांनी पुढील वाचावे.

Tyler Durden, गांधी, आणि सावरकर या तिघांचेही उद्दिष्ट, इप्सित, इष्टदैवत एकच होते - स्वातंत्र्य. त्यांच्या भोवतीची समाजस्थिती मोडून काढायला, बदलायलाच हे तिघेही उभे ठाकले होते. Tyler ला materialism ची गुलामी जाचत होती, तर गांधी-सावरकरांना ब्रिटिशांची. Tyler ची गुलामी पूर्णपणे मानसिक होती, तर गांधी-सावरकरांची (प्रामुख्याने) भौतिक, हा एकच महत्त्वाचा फरक. येनकेन प्रकारे "स्वराज्य" मिळवण्यासाठीच हे तिघेही लढत होते.

गांधीवाद आणि सावरकरवाद जर खरेच परस्परविरोधी असतील, तर स्वतंत्रतादेवीच्या या पाश्चात्त्य उपासकाला, म्हणजेच Tyler Durden ला, त्यांपैकी एका गटात टाकणे सोपे झाले पाहिजे, नाही का? 

Fight Club मधला Tyler Durden तुम्हाला गांधीवादी वाटतो की सावरकरवादी वाटतो?

Fight Club साठीची जागा जपण्यासाठी हॉटेल मालकावर चुकूनही हात न उगारता त्याचा मार खाऊन त्याला दमवून, शरमिंदा करून नमवणारा Tyler गांधीवादी, की सावरकरवादी?

स्वतःच्या वरिष्ठासमोर स्वतःला रक्तबंबाळ करून घेऊन वरिष्ठाला त्याबद्दल गोत्यात आणणारा Tyler गांधीवादी की सावरकरवादी?

स्वतःची सिद्धता तपासून पाहण्यासाठी साबण बनवण्याच्या रसायनांनी स्वतःचा हात स्वतःच भाजून घेणारा Tyler गांधीवादी की सावरकरवादी?

नव्या recruits ना दिवसेंदिवस घराबाहेर, ऊनपावसात, खायला अन्न व प्यायला पाणी न देता उभं करून त्यांची सत्त्वपरीक्षा बघणारा, आपली तत्त्वं त्यांना अंगवळणी पडली आहेत की नाही, याची पुरेपूर पडताळणी करून मगच नव्या recruits ना Project Mayhem मध्ये भरती करणारा Tyler गांधीवादी की सावरकरवादी?

नव्या recruits नी पहिल्या दिवशी fight club मध्ये भाग घेतलाच पाहिजे, मार खाल्लाच पाहिजे, म्हणणारा Tyler गांधीवादी की सावरकरवादी? लढून हरणारा नव्हे, तर लढायला घाबरणारा खरा निरुपयोगी, मागे हटणारा खरा निरुपयोगी, असे सांगणारा Tyler गांधीवादी की सावरकरवादी?

नव्या recruits नी मार खाऊन खचून न जाता त्यातून स्वतःला घट्ट बनवलं पाहिजे अशी अपेक्षा धरणारा Tyler गांधीवादी की सावरकरवादी?

नव्या recruits ना समाजावर त्रयस्थपक्षाकडून (third party) लादले गेलेले नियम मोडता आलेच पाहिजेत, पण fight club चे नियम मोडता उपयोगी नाही, असे सांगणारा Tyler गांधीवादी की सावरकरवादी?

स्वतःमधल्याच अशक्तपणाशी स्वतःच भांडणारा, आणि त्या भांडणातून इतरांना तेच भांडण करण्याची प्रेरणा देणारा Tyler गांधीवादी की सावरकरवादी?

या प्रश्नांची उत्तरं मला तरी (असंदिग्धपणे) स्वतःची स्वतःला देता आलेली नाहीत. तुमच्यापैकी कुणाला निःसंशय एका गटात Tyler Durden ला टाकता आलं असेल तर मला तुमच्याशी बोलायला नक्कीच आवडेल.

Tyler ला materialism पासून मुळातच स्वातंत्र्य हवं होतं, तर गांधी आणि सावरकर दोघांनीही materialism मधल्या "materials" चे symbolic महत्त्व ओळखून स्वदेशी वस्तू वापरण्यावर आणि विदेशी वस्तू नाकारण्यावर भर दिला होता, हा या तिघांमधला समान धागासुद्धा मला मजेशीर वाटतो.

मग गांधीवाद आणि सावरकरवाद जर खरेच परस्परविरुद्ध असतील, तर Tyler Durden ला दोनातल्या एका गटात टाकणं इतकं अवघड का व्हावं?

विदेशी वस्तूंची होळी करणारे सावरकर आणि स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार करणारे गांधी जर Tyler Durden च्या जगात जन्माला आले असते, तर कोणी काय केलं असतं? Tyler जर भारतात १९व्या शतकाच्या उत्तरार्धात जन्माला आला असता, तर गांधी झाला असता, की सावरकर?

Tyler Durden "गांधींचा" की "सावरकरांचा"?

_______________________________

०२/१०/२०२४ ला सुचलेला आराखडा आज कुणाचीही जन्म/पुण्यतिथी नसताना संकलन-संपादन करून प्रकाशित करत आहे. यामध्ये गांधी वा सावरकर कुणालाच कमी लेखण्याचा हेतू नाही, हे मजकूर वाचला तर लक्षात येईलच. याउलट भारतीय मनातल्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेच्या या गंगा-जमुना ज्या एकाच पर्वतधारेतून उगम पावतात, त्या पर्वतधारेतून सिंहावलोकन करायचा हेतू आहे. तो त्याच दृष्टीने वाचावा.

- तन्मय विराज टिकेकर, १२/०२/२०२५

No comments:

Post a Comment