Thursday, October 22, 2026

कविता - माणसं

माणसं कशी लख्ख हवी
सड्यासारखी स्वच्छ हवी
फणसासारखी काटेदार
पण आतून गोड गोड हवी!

पाऊस आला की भान विसरून
भिजून जाणारी माणसं हवी
पावसानंतर स्वतःचं अंगण 
झाडून काढणारी माणसं हवी,
माणसं कशी लख्ख हवी!

गोड बोलून भुलवणारे
साखरपेरले शब्द नको
फिल्टर लावलेले पोर्ट्रेट नको
आरशासारखी स्वच्छ हवी,
माणसं कशी लख्ख हवी!

माणसांना काहीतरी हट्ट असावा 
कुठेतरी धारदार कोपरा असावा 
सरळसोट रस्ता नको
वळणावळणाची वाट हवी,
माणसं कशी लख्ख हवी!

गाभाऱ्यात त्यांच्या ज्योत हवी 
मनात नम्र प्रीत हवी 
पाषाणांवर राम लिहून
माणसं जोडणारी हवी,
माणसं कशी लख्ख हवी!

- तन्मय वि. टिकेकर

कविता - दोन निमिषांची परब्रह्मभेट

दोन निमिषांची । परब्रह्मभेट ।
दिसे का रे नीट । मुख तरी ।।
दोन निमिषांत । मागणे गा-हाणे ।
देवासी सांगणे । कसे तरी ।।
दोन निमिषांत । हाललीच रांग ।
कावला श्रीरंग । विटेवरी ।।

- तन्मय वि. टिकेकर

कविता - रात्र

अंधार असा भोगावा
रात्रीस असे बिलगावे
शब्दांच्या निळसर गात्री
चांदणे फुलारून यावे

दवभिजला प्रकाश होता
हलकेच म्हणावी गाणी
पापण्यांस अन् लावावे
ओढ्याचे निर्मळ पाणी

- तन्मय वि. टिकेकर

कविता - कुंपण

दारी उभा गं साजण
त्याचे लख्ख निळे अंग
मंद निळाईत त्याच्या 
उभी क्षितिजांची रांग

वाडा होता चिरेबंदी
कुणी दार उघडले?
कडीतले देवघर
कुणी अंगणी आणले?

पसरली रानोरान
उदा-धुपातली कथा
गंगा सागरी आणते
जशी पितरांची गाथा

वृक्ष सारे थरारले
अन् पिसाटली राई 
भोळ्या गीताने झिंगली
खुळावली मातीमाई

मग बरसला मेघ
त्याने भरले अंगण
मोरपंखी निळाईला
घालू नये गं कुंपण!

- तन्मय वि. टिकेकर

कविता - वाळू

एक दिवस मनात आले,
खोदली वाळू समुद्राकाठची

आकार दिला तिला
पाण्याचे हबके मारून

घरे बांधली
दारे बांधली
आपलेपणाची
वेस बांधली

माझे बांधले
तुझे बांधले
त्या दोघांतील
नाते बांधले

इमल्यावर इमले
मजल्यावर मजले
वाढवीत गेलो
चढवीत गेलो
किनार्यावरच्या मातीमधून 
मूठ मूठ काढीत गेलो

शेवटी वाळू दमून गेली
आकारांना कंटाळून गेली
अस्तित्वाच्या ओझ्याखाली 
आपसूकच कोसळून गेली 

कोसळले सारे 
घाम गाळून बांधून काढलेले महाल
कोसळले आकार, कोसळले शब्द
कोसळले तुझे-माझे निळेभोर आकाश 

शिल्लक राहिले वाळूचे समुद्राकाठी असणे
अर्थहीन, निराकार

आता मी वाळूमध्ये
महाल बांधायला जात नाही
पाय बुडवून उभा राहतो फक्त
ओल्याचिंब समुद्राच्या काठावर  

- तन्मय वि. टिकेकर

कविता - सळसळ

दिवसपणाला येते जेव्हा
अतर्क्यातली कळा,
निळ्या कपाळी साजुन दिसतो
हा भगव्याचा टिळा 

संध्यामधुरा व्याकुळलेली
आभाळाशी गाते गाणी
हिरव्या पिवळ्या कुरणांमध्ये
दाटुन येते गर्द विराणी

कुठून येते हृदयामध्ये
अनवट नाजुक कोमल थरथर,
खिन्न अंतरी दाटून येते
अस्तित्त्वाची अबोल सळसळ 

क्षणैक दिसते शब्दांमधुनी
नि:शब्दाचे उघडे मंदिर
सांज नभातुन सरून जाता
अंधाराला येतो पाझर

- तन्मय वि. टिकेकर

कविता - विठ्ठलाचे गाणे

पंढरी महायोगपीठ | कुंकुम-अबीराची तीट |
देव पाही महाधीट | विटेवरी |
समूळमाया विश्वेश्वर | उभा ठाकिलासे विटेवर |
ध्यान सावळे सुंदर | सुशोभित |
अठ्ठावीस युगांचा योगी | अलक्ष्य निर्मोही विरागी |
कावला वियोगे अरोगी | भक्तांचिया |

हे कायसे देवभक्त | आगंतुकांची गर्दी फक्त |
कर्म-धर्म-विसंगत | भक्तीहीन |
हे तो अवघे तामसिक | नानायाजी अरसिक | 
अधासी ओढिती आपणिक | सकळ भोगा |
विरक्त म्हणविती आसक्त | देवासीच मागती स्वार्थ |
"तोचि बोलवी" म्हणती फक्त | व्यर्थ शब्दें |

धावुनिया भक्तमनीं | राणा करी मनधरणी |
म्हणितो मीची करी विनवणी | अवधारा जी |
अंतर आपुले पहावे | माझें म्हणोनि धरावे |
माझेंचि आपुले करावे | रामकाम |
देव विठ्ठल सावळा | पहावा आपुला-आपुला |
हृदयंतरी वसिला | दास म्हणे ||

- तन्मय

कविता - नोआचे वचन

नोआला दिलेल्या वचनासाठी, 

त्यानेच रचलेल्या आभाळातल्या 

इंद्रधनूला प्रमाण मानून,

देवाने मानवाशी केला करार:


पुन्हा पूर येणार नाही,

पुन्हा पूर येणार नाही,

सारे काही पुन्हा कधी

वाहून असे जाणार नाही ||


आमचे बघून, त्यातून शिकून,

काही करू लागलाच आहेस,

अधिपत्य जिथे तिथे

तुझे गाजवू लागलाच आहेस,


तर मग ही सृष्टीच घे हाती!

माती-पाणी-वारा-अग्नी,

आभाळ, वने, पक्षी, प्राणी,

या सर्वांच्या भाग्यरेषा

तुझ्याच हाती राहू देत,

या सर्वांचे कोवळे कोंब,

तुझ्याच हाती वाढू देत ||


फक्त एक घे आण,

प्रयत्नांती परमेश्वर जाण ||


तुझ्याच मनी वास्तव्याला

येऊन राहीन म्हणतो,

तुझ्या हाताने सृष्टी पुन्हा

बांधून काढीन म्हणतो ||


तरून गेलास महापूर,

तू तसाच पुढे चालत रहा,

माझी आठवण काढत रहा,

आत डोकावून पाहत रहा,

माझी आठवण काढत रहा,

आत डोकावून पाहत रहा ||


- तन्मय वि. टिकेकर


27/08/2025

गणेश चतुर्थी